कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शेकापसह राजर्षी शाहू समविचारी आघाडीने बाजी मारली आहे. एकूण 25 जागांपैकी समविचारी आघाडीचे 13 उमेदवार विजयी झाले असून,या निवडणूकीत समविचारी आघाडीने महायुतीवर मात केली आहे. या निकालाने महायुतीच्या मातब्बर नेत्यांना जोर का झटका लागला असून पराभव न पचल्याने त्यांनी फेरमोजणीची मागणी केल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली.
सहकार क्षेत्रातील प्रस्थापित राजकीय ताकदीला धूळ चारत शेतकरी कामगार पक्षाने गोकुळच्या निवडणुकीत आपली छाप उमटवली आहे. शेकापचे बाबासाहेब दरेकर यांच्या विजयामुळे सहकाराच्या आखाड्यात लाल बावट्याचीच चर्चा रंगली आहे. शेतकरी, कष्टकरी आणि दूध उत्पादकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेकापच्या राजकीय भूमिकेला या घडामोडीमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील व काँग्रेसचे आ.सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने जोरदार मुसंडी मारत 13 जागांवर विजय मिळविला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारांच्या ताकदीच्या जोरावर मैदानात उतरलेल्या महायुतीला जोरदार धक्का देत आघाडीने सहकार क्षेत्रात झेंडा रोवला.
गोकुळच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दूध संघावरील वर्चस्वासाठी महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली. मतदानात तब्बल 99.96 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर समविचारी आघाडीने 13 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले, तर महायुतीला बारा जागांवर समाधाना मानावे लागले.
गोकुळची निवडणूक म्हणजे केवळ दूध संघाच्या सत्तेची लढाई नव्हे, तर सहकार क्षेत्रातील राजकीय वर्चस्वाची कसोटी होती. या निवडणुकीत विविध राजकीय आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील व काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या हालचालींकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर बाबासाहेब दरेकर यांच्या विजयाची चर्चा शेकापच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.
शेतकरी-कष्टकऱ्यांच्या विचारांचा लाल बावटा
शेतकरी कामगार पक्षाची राजकीय ओळख ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नाही. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणे, हा पक्षाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. सहकार क्षेत्रातही दूध उत्पादकांचे प्रश्न, दूधदर, उत्पादन खर्च आणि संस्थांच्या कारभारातील पारदर्शकता हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. गोकुळसारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थेत बाबासाहेब दरेकर यांच्या विजयामुळे या प्रश्नांना व्यासपीठ मिळाली असल्याचे मत बाबासाहेब दरेकर यांनी व्यक्त केले.
प्रस्थापितांना शेकापचा राजकीय संदेश
सहकार क्षेत्रातील राजकारणात स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचे जाळे आणि दूध उत्पादकांशी असलेला संपर्क यांना मोठे महत्त्व असते. अशा परिस्थितीत शेकापच्या बाबासाहेब दरेकर यांनी मताधिक्याने विजय मिळविल्याने शेकापने कृतीतून प्रस्थापितांना चांगलाच धडा शिकविल्याचे दिसून आले. लाल बावटा हा संघर्षाचा, कष्टकऱ्यांच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा प्रतीकात्मक आवाज आहे. गोकुळमधील या विजयाच्या पार्श्वभूमीवर शेकापची भूमिका सहकार क्षेत्रात अधिक ठळक झाली आहे. गोकुळच्या आखाड्यातील ही घडामोड शेकापच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक ठरत आहे.
महायुतीकडून शपथ, धार्मिक खेळ
गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी राजकीय शक्ती आणि समविचारी आघाडी यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत समविचारी आघाडीने मिळविलेल्या यशामुळे सहकार क्षेत्रातील स्थानिक नेतृत्वाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. दूध उत्पादक सभासदांचा विश्वास संपादन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी ठरावधारकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत धमकावण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर त्यांना यल्लामा देवीच्या परडी, भंडारावर हात मारून त्यांना आम्हालाच मतदान करा, आम्हाला मतदान नाही केलं तर देवीचा कोप होईल. इतकेच नव्हे तर बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेनस्ट्रोक होईल, इतक्यापर्यंत धमकावण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून झाले होते. मात्र, गोकुळ हा दूध उत्पादकांचाच असल्याचा आज गोकुळच्या दूध उत्पादकांनी आपल्या मतदानातून दाखवून दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.









