हजारो झाडांच्या कत्तलीचा आरोप; वृक्षतोड तातडीने थांबवण्याची चित्रलेखा पाटील यांची मागणी
मागण्या मान्य न झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा
रायगड (प्रतिनिधी): कर्जत आणि भीमाशंकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या टोरंटो प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप करत शेकापने पर्यावरणाच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड तातडीने थांबवावी आणि पर्यावरणविषयक सर्व निकषांचे काटेकोर पालन करूनच प्रकल्प उभारावा, अशी मागणी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.
विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्यास त्याचे दूरगामी परिणाम पर्यावरणावर होऊ शकतात, अशी चिंता शेकापने व्यक्त केली आहे. झाडांची कत्तल झाल्यामुळे परिसरातील नैसर्गिक समतोल बिघडण्याची शक्यता असून, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रश्नही गंभीर बनू शकतो. त्यामुळे प्रकल्प राबवताना पर्यावरणाचे संरक्षण करण्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी म्हटले आहे.
प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा पर्यावरणीय निकषांचे पालन करून विकासकामे केली जावीत, अशी भूमिका शेकापने मांडली आहे. प्रकल्पाच्या कामामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी संबंधित प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थापनाने तातडीने लक्ष घालावे. वृक्षतोडीबाबत योग्य ती कार्यवाही करून पर्यावरणाचे नुकसान रोखावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेकापने आंदोलनाचा इशारा दिला आहे. वृक्षतोड थांबवण्यासह आपल्या मागण्या मान्य न झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येईल, असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
टोरंटो प्रकल्पाच्या निमित्ताने विकास आणि पर्यावरण संवर्धन यांच्यातील समतोलाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता शेकापच्या मागण्यांवर प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थापन काय भूमिका घेते, तसेच वृक्षतोडीबाबत कोणती कार्यवाही केली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









