अलिबागच्या विकासाचा ‘फिल्ड रिपोर्ट’; प्रशांत नाईक यांच्याकडून विविध कामांची पाहणी


समुद्रकिनाऱ्यापासून बाजारपेठेपर्यंत विकासकामांचा आढावा; नागरिकांसह पर्यटकांच्या सुविधांना प्राधान्य

अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील नागरिक तसेच पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

अलिबाग समुद्रकिनारी सुरू असलेल्या खुल्या रंगमंचाच्या कामाची तसेच समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या रणगाड्यांच्या रंगकामाची प्रशांत नाईक यांनी पाहणी केली. शहराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने समुद्रकिनारा हा महत्त्वाचा घटक असून, येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षक आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

यावेळी श्रीबाग स्मशानभूमी परिसरात काळी-पिवळी टॅक्सी उभी करण्यासाठी सुरू असलेल्या कामाचीही पाहणी करण्यात आली. तसेच म्हाडा कॉलनी येथील ‘आपला म्हाडा’ नामकरणाच्या कामाची माहिती घेऊन संबंधित कामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, प्रशांत नाईक आणि अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी अलिबाग मासळी बाजार तसेच भाजी मंडईच्या इमारतीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या कामांच्या प्रगतीबाबत संबंधितांकडून माहिती घेत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला.

अलिबाग नगर परिषद विकासकामांच्या बाबतीत अग्रेसर असून शहरातील नागरिकांसोबतच अलिबागला भेट देणाऱ्या पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये आणि कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी आवश्यक ती तत्परता दाखवली जात आहे, असे प्रशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.

शहरातील पर्यटन, सार्वजनिक सुविधा, बाजारपेठा आणि मूलभूत सोयी-सुविधांचा समतोल विकास साधत अलिबागला अधिक सुंदर, सुविधायुक्त आणि पर्यटकाभिमुख शहर बनविण्याच्या दिशेने नगर परिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत.