आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत स्वागत पाटील व प्रसन्न पवार यांचे उल्लेखनीय यश


अलिबाग(प्रतिनिधी): आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स (पुरुष व महिला) स्पर्धा २०२६-२७ मध्ये प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वेश्वी, अलिबाग येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्वागत पाटील आणि प्रसन्न पवार यांनी विविध क्रीडाप्रकारांत यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

एस. व्ही. जे. सी. टी. डेरवण, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे दि. २१ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत स्वागत पाटील याने १०,००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तर ५,००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, प्रसन्न पवार याने लांब उडीच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला.

या यशस्वी कामगिरीसाठी दोन्ही विद्यार्थ्यांना संघप्रशिक्षक प्रा. हर्षल काठे यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, कॉलेजचे संचालक प्रा. विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कार्यालयीन समन्वयक गबाजी गीते, क्रीडा प्रशिक्षक प्रा.  तेजस म्हात्रे, क्रीडा विभागप्रमुख प्रा. स्वराली ठाकूर, तसेच प्रा. लवेश पाटील व प्रा. जयश्री ठाकूर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.