मुंबई लोकलच्या दरवाजात दोन महिलांमध्ये हाणामारी; एक महिला गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल


मुंबई ( प्रतिनिधी) मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकलच्या दरवाजातच दोन महिला प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून, त्यामध्ये एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, लोकलमधील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दरवाजातून आत-बाहेर पडण्याच्या वादातून ही झटापट सुरू झाली. या मारहाणीत एक महिला प्लॅटफॉर्मवर फेकली गेल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसून येत आहे.

या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित महिलांची ओळख पटवून पुढील कारवाई केली जात असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीची मागणी केली आहे.