प्राप्त माहितीनुसार, जुना मुंबई–पुणे महामार्गावरील घोडीवली फाटा येथे गांज्याची विक्री होणार असल्याची पक्की खबर खालापूर पोलीस ठाणे व रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या लेखी आदेशानुसार, पोलिस निरीक्षक सचिन पवार, फौजदार संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन पंच साक्षीदारांसह ठिकाणी सापळा रचला.
थोड्याच वेळात दोन इसम स्कूटीवर गांजा विक्रीसाठी आले असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील ३३८३ किलो ग्रॅम वजनाचा गांजा, अंदाजे १,२०,००० किंमतीचा, तसेच २,००,००० किंमतीच्या दोन स्कूटी जप्त करण्यात आल्या. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांनी हा गांजा कुठून आणला आणि त्यांच्या मागे इतर कोणते साथीदार आहेत का, याचा तपास सुरू आहे.
या कारवाईसंदर्भात गुन्हा रजि. नं. 340/2025 असा नोंदवण्यात आला असून, NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)ii, 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, खालापूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गांजा, ड्रग्ज किंवा इतर नशाकारक पदार्थांचा व्यापार अथवा साठा करणाऱ्या व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष (रायगड अलिबाग), डायल 112, किंवा ‘रायगड दृष्टी’ व्हॉट्सअॅप क्रमांक 7620032931 यावर कळवावी. नागरिकांच्या सहकार्यानेच अशा गुन्हेगारी कारवायांवर प्रभावी आळा घालता येईल, असे पोलिसांनी सांगितले.









