महाड नगरपालिका निवडणुकीत शिंदे गट–पवार गट आमनेसामने; हाणामारी, वाहनांचे नुकसान आणि तणावग्रस्त वातावरण


रायगड (प्रतिनिधी): महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक २ आणि ३ मधील मतदान केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या वादात काही वाहनांची तोडफोडही झाली असून परिसरात तणाव निर्माण झाला.

जुन्या स्टेट बँकेजवळील मतदान केंद्राबाहेर बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे गोंधळ होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे होत होत्या, मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप उपस्थितांनी केला.

दरम्यान, नवे नगर शाळा क्र. ५ येथे शिवसेना युवा नेते विकास गोगावले यांच्यावर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गोगावले यांनी दावा केला. त्यांनी जप्त केलेला रिव्हॉल्वर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचेही सांगितले.

घटनेनंतर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी दाखल झाली आहे.