राज्य सांस्कृतिक पुरस्कारांवर अलिबागची मोहर कस्तुरी देशपांडे आणि अनुराग गोडबोले युवा पुरस्काराने सन्मानित


रायगड (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या यादीत यंदा अलिबागचा दिमाखदार सहभाग नोंदला गेला आहे. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या शासकीय समारंभात कस्तुरी देशपांडे–मांजरेकर हिला कलादान युवा पुरस्कार तर अनुराग गोडबोले याला युवा संगीत संयोजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते दोघांचा गौरव झाला. या पुरस्कारात एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असा समावेश आहे.

कस्तुरी आणि अनुराग यांचे शिक्षण अलिबागच्या आरसीएफ शाळेत झाले. शास्त्रीय गायिका शीतल कुंटे यांच्याकडे दोघांनी संगीताची प्राथमिक तालीम घेतली. कस्तुरीने पुढे निषाद बाक्रे, गौरी पाठारे आणि पं. अरुण कशाळकर यांच्याकडे शिक्षण घेतले असून तिला केंद्र शासनाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई विद्यापीठातील एमए पदवी परीक्षेत ती प्रथम आली होती. सध्या ती भारतीय शास्त्रीय संगीतावर पीएचडी करत आहे.

अनुराग गोडबोले हा मुंबई विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवीधर असून मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आश्वासक संगीतकार म्हणून त्याने नाव कमावले आहे. पं. संजीव चिंबळगी यांच्याकडून तालीम घेतल्यानंतर स्व. अनिल मोहिले यांच्यासारख्या गुरुंकडून संगीत दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले. बॉईज फोर, पांडूसह अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांसाठी त्याने संगीत संयोजन केले आहे.

अलिबागमध्ये संगीताची शिकवण घेतलेल्या या दोन्ही कलाकारांना राज्याचा सन्मान मिळाल्याने स्थानिक कलावर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र त्यांच्या प्रतिभेचे कौतुक होत आहे.