लोणावळा  टायगर पॉईंटजवळ भीषण अपघात – दोन तरुणांचा मृत्यू


लोणावळा (दत्तात्रेय शेंडगे): लोणावळ्यातील शिवलिंग पॉईंटजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. गोव्यातील हे दोघे युवक पर्यटनासाठी लोणावळ्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्याहून सहारा सिटीकडे जात असताना स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला.

या अपघातात कारचालक योगेश सुतार (21, रा. म्हापसा गोवा) आणि त्याच्यासोबत असलेला मयूर वेंगुळकर (24, रा. म्हापसा गोवा) यांचा अतिरक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग टीम हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.