वाशी परिसरात पोलिसांची धडक कारवाई; ड्रग्स तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
नवी मुंबई (प्रतिनिधी):अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत नवी मुंबई पोलिसांनी सुमारे १३ किलो ‘हायड्रो गांजा’ जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे १३ कोटी ५० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांच्या विक्री व वाहतुकीसाठी काही व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून उच्च प्रतीचा ‘हायड्रो गांजा’ जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे पुण्यातील असून एक आरोपी उल्हासनगर येथील असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ‘हायड्रो गांजा’ हा विशेष पद्धतीने नियंत्रित वातावरणात पिकवला जातो. त्यामुळे त्याची गुणवत्ता आणि बाजारभाव सामान्य गांजापेक्षा अधिक असतो. अलीकडच्या काळात महानगरांमध्ये अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची मागणी वाढल्याचे तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या मालाचा पुरवठा कुठून झाला, आर्थिक व्यवहारांची साखळी काय आहे आणि या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून तस्करांचे धाबे दणाणले आहेत. यात आणखी काही अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









