शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी; महाविकास आघाडीकडून अधिकृत घोषणा


मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीकडून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही अधिकृत घोषणा केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आभार मानत पवारांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा देशाला लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, पवार रिंगणात उतरल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि एकमुखी पाठिंबा पाहता पवारांच्या उमेदवारीला व्यापक राजकीय पाठबळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द तब्बल ५९ वर्षांची आहे. या कालावधीत त्यांनी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा अशा तिन्ही पातळ्यांवर प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे, इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी एकही निवडणूक पराभूत झालेली नाही, हा त्यांचा उल्लेखनीय विक्रम मानला जातो. यापूर्वी ते दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले असून दोन्ही वेळा त्यांची निवड बिनविरोध झाली होती.
यंदाही त्याच परंपरेची पुनरावृत्ती होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पवारांच्या उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.