राजिपकडून स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान


अलिबाग (प्रतिनिधी): स्वच्छता अभियानामुळे गावांचा चेहरा मोहरा बदलत आहे. स्वच्छता राखण्यात महिलांचे भरीव योगदान आहे. त्यामुळेच महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत बुधवारी (ता.११) स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सरपंच व महिला स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार करण्यासाठी कॉफी विथ विनर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 15 तालुक्यातील 30 महिला सरपंच व 30 महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शीनी मोरे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्राधान्य द्यावे. तसेच उपलब्ध निधी स्वच्छता व पाणी पुरवठा या विषयावर खर्च करून गावे स्वच्छतेत आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी मार्गदर्शन करताना, कचराच होणार नाही याची दक्षता महिलांनी घ्यावी. ओला कचरा व सुका कचरा घरच्या घरी विलगीकरण झाल्यास गाव स्वच्छ राहण्यास मोठी मदत होईल. ओला कचऱ्याचे खतात रुपानतर होणे आवश्यक आहे. सुका कचरा हा पुनर्प्रक्रियेसाठी पाठवून कमी करता येईल. महिला बचत गटदेखिल ग्राम स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत, असे सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी, स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सरपंच यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. शृंखला फाउंडेशनच्या अध्यक्ष अस्मिता शर्मा यांनी शून्य कचरा मोहिमेमध्ये कचरा कमी करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

*********

ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी कंपोस्ट खड्ड्याचा वापर होणे आवश्यक आहे. तसेच प्लास्टिक चे विलगीकरण करुन त्याच्यावर प्रक्रीया करण्यात यावी. वाढते औद्योगीकरण व प्लास्टिकचा अमर्याद वापर यावर प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जर कंपन्या व दुकानदारांनी सूचनांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. आज ज्या महिला सरपंचांचा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला त्यांनी इतरांनाही प्रोत्साहित करावे.
– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप