अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी केळवणे गटाचे सदस्य मंगेश रामचंद्र वाकडीकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत माहिती भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे दिली आहे.
११ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी मंगेश वाकडीकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून त्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या पत्राची प्रत रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष धैर्यशील मोहन पाटील तसेच रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश महादेव कोळी यांनाही पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपने मंगेश वाकडीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.






