रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड


अलिबाग(प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी ता.12 पार पडली. या निवडणुकीत भाजपचे मंगेश वाकडीकर यांचा अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार गट) मधुकर पाटील यांचा प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी घोषित केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या 59 सदस्यांसाठी निवडणूक 7 फेब्रुवारीला घेण्यात आली. त्यानंतर 12 मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बैठकीचे आयोजन केले. गुरुवारी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी होता. या वेळेत भाजपकडून अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
निवड जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष मंगेश वाकडीकर व उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी कुंटेबाग येथील रायगड जिल्हा परिषदेत आपल्या दालनात पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख तसेच पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.