रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर, उपाध्यक्षपदी मधुकर पाटील बिनविरोध


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निर्विरोध झाल्याची घोषणा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी केली.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात सत्तास्थापनेबाबत राजकीय हालचालींना वेग आला होता. सुरुवातीला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील आणि शिवसेना (शिंदे गट) सत्तेबाहेर राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात विविध स्तरांवर चर्चा सुरू केल्या होत्या.
दरम्यान, मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनीही सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून राजकीय भूमिका स्पष्ट केल्यानंतर जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली. मात्र सुरुवातीला या युतीत शिवसेना (शिंदे गट) सहभागी नव्हती.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) सर्वाधिक २१ जागांवर विजयी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला १६, भाजपला १५, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ५ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. एकूण ५९ सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी ३० सदस्यांचे बहुमत आवश्यक होते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांकडे मिळून ३१ सदस्यांचे संख्याबळ होते. त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने हे संख्याबळ ३८ पर्यंत पोहोचले.
सत्तास्थापनेपूर्वी घोडेबाजार किंवा फूट पडू नये, यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना जवळपास महिनाभर गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. अखेरीस ११ मार्च रोजी वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर शिवसेना (शिंदे गट) यांनाही सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महायुती तयार झाली.
महायुतीत सत्तेचे सूत्रही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सुरुवातीची सव्वा वर्षे अध्यक्षपद भाजपकडे राहणार असून त्यानंतरची सव्वा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिली जाणार आहेत. पुढील अडीच वर्षे शिवसेना (शिंदे गट) अध्यक्षपद सांभाळणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडून मंगेश वाकडीकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने उपाध्यक्षपदासाठी मधुकर पाटील यांना उमेदवारी दिली.
अर्ज दाखल करताना मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना नेत्या मानसी दळवी यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) यांना महायुतीत सामावून घेण्याच्या निर्णयामुळे काही पदाधिकारी आणि नवनिर्वाचित सदस्यांमध्ये नाराजीची भावना दिसून आली. मात्र वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश मान्य करत अखेरीस हा निर्णय स्वीकारण्यात आला. त्यामुळे नियोजन भवनातील सभागृहात अपेक्षित उत्साह दिसून आला नाही आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वातावरण तुलनेने शांत राहिले.
याबाबत बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये महायुतीने एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगडमध्येही तिन्ही पक्षांनी एकत्र येत जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला आहे. विविध पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले असून जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.