रायगडमध्ये घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा; टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सध्या कोणतीही टंचाई निर्माण झालेली नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे. काही ठिकाणी गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याने नागरिकांनी अनावश्यक घाईगडबड करून गॅस एजन्सीसमोर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग साधारणपणे २५ दिवसांच्या कालावधीनंतर करता येते. त्यामुळे नियमानुसार बुकिंग केल्यास सर्व ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळणार असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले.
काही नागरिक अफवांवर विश्वास ठेवून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गॅस घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र जिल्ह्यात गॅस उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नसल्याने नागरिकांनी संयम राखावा आणि नियमित प्रक्रियेनुसारच बुकिंग करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गॅस पुरवठा यंत्रणा सुरळीत सुरू असून सर्व ग्राहकांना नियमानुसार गॅस सिलिंडर उपलब्ध होणार असल्याची ग्वाहीही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.