अलिबाग (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या प्रस्तावित नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ आज (बुधवार) अलिबाग शहरात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे भव्य पदयात्रा काढण्यात आली. भाजप महिला आघाडी दक्षिण रायगडच्या जिल्हा उपाध्यक्षा ॲड. मनस्वी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या पदयात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
केंद्र सरकारकडून लोकसभा, राज्यसभा तसेच राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मांडण्यात येणार असून, त्यासाठी १६ एप्रिलपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधेयक मंजूर झाल्यास २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू होणार आहे.
अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून ही पदयात्रा काढण्यात येत श्री काळंबादेवी मंदिराजवळ तिची सांगता करण्यात आली. पदयात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच अधिनियमाच्या समर्थनार्थ संदेश देणारे फलक महिलांच्या हाती होते.
काळंबादेवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. मनस्वी मोहिते यांनी सांगितले की, “महिलांच्या सक्षमीकरणासाठी नारीशक्ती वंदन अधिनियम हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या माध्यमातून महिलांना संसद व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार असून, अधिकाधिक महिलांना समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.” त्यांनी सर्व महिलांनी या विधेयकाचे स्वागत करावे, असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख संजीवनी नाईक तसेच भाजपच्या पल्लवी तुळपुळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्वाक्षरी व संदेश अभियान राबवण्यात आले.
या पदयात्रेत पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मृणाल खेडकर, अलिबाग पंचायत समिती सभापती भाग्यता पाटील, शर्मिला पाटील, मंडल अध्यक्ष वृंदा राजगे, ऋतुजा पिंगळे यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. तसेच भाजपा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते, ॲड. आस्वाद पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते.






