अलिबाग (प्रतिनिधी) : कोकणातील महामार्ग विस्तार आणि विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर शेकडो वर्षे जुनी झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र या वृक्षतोडीनंतर नव्याने झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे याकडे संबंधित यंत्रणांकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संकेत सकपाळ यांनी केला आहे.
महामार्गाच्या दुतर्फा पूर्वी दाट झाडांची हिरवाई होती. या झाडांमुळे प्रवाशांना उन्हापासून दिलासा मिळत होता, तसेच स्थानिक पर्यावरणाचे संतुलन राखले जात होते. मात्र सध्या या मार्गांवर एकही झाड शिल्लक नसल्याने प्रवाशांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. परिणामी, प्रवास अधिक त्रासदायक आणि असुरक्षित झाला आहे.
संकेत सकपाळ यांनी सांगितले की, कोकणच्या विकासासाठी महामार्ग उभारणी निश्चितच आवश्यक आहे. मात्र विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देणे योग्य नाही. झाडे तोडताना पर्यायी वृक्षलागवडीचे नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र लागवड केवळ कागदोपत्रीच होत असल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच लावण्यात येणाऱ्या रोपांची योग्य निगा राखली जात नसल्याने ती टिकून राहत नाहीत. त्यामुळे वृक्षतोडीची भरपाई होत नसून पर्यावरणीय असंतुलन वाढत आहे. याचा परिणाम स्थानिक हवामान, जैवविविधता आणि पावसाच्या पॅटर्नवरही होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी, तसेच त्या झाडांचे संगोपन आणि संरक्षण सुनिश्चित करावे, अशी मागणी संकेत सकपाळ यांनी केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास साधणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






