श्रीवर्धन पोलिसांची धडक कारवाई; ३५ लाखांचा चरस जप्त, एकाला अटक


अलिबाग(प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ३५ लाख १८ हजार रुपयांचा चरस जप्त केला आहे. या प्रकरणी सादिक इब्राहिम शेखवडे (वय ६३, रा. शेखवाडी, ता. श्रीवर्धन) याला अटक करण्यात आली आहे.
श्रीवर्धन पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेंद्र गड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कोंडवली स्मशानभूमी परिसरात सापळा रचला. संशयित मोटारसायकलवर येत असताना त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता २.१४६ किलो वजनाचा चरस आढळून आला. त्याची किंमत १० लाख ९३ हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय तपासादरम्यान आरोपीने शेखवाडी येथील बंद घरातील फायरवूड बॉक्समध्ये लपवून ठेवलेला आणखी ४.०५० किलो चरस पोलिसांनी जप्त केला. या मालाची किंमत २४ लाख २५ हजार रुपये आहे.
या कारवाईत एकूण ६.१९६ किलो चरस (किंमत ३५ लाख १८ हजार रुपये), एक मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड करत आहेत.