अलिबाग(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने दरवर्षी १५ जुलै हा कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने कबड्डी आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येतो.
यावर्षी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील राष्ट्रीय कबड्डी पंच हिरामण भोईर यांना कबड्डी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “ज्येष्ठ पंच” हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, माजी मंत्री तथा खासदार व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर, आमदार भाई जगताप, आमदार किरणभैय्या सामंत, आमदार प्रमोद जठार, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, उपाध्यक्ष शशिकांत गाडे, सहकार्यवाह माधव गायकवाड, खजिनदार मंगल पांडे, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष मंगेश तांबे, यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि उदयोन्मुख खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय पंच श्री भोईर यांनी कबड्डीच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा करण्यात आलेला सन्मान रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. याआधी त्यांना रायगड भूषण पुरस्कार, क्रीडा विभागाचा गुणवंत क्रीडा संघटक, अखिल आगरी संघातर्फे क्रीडा रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
हिरामण भोईर यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आस्वाद पाटील , रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यवाहक डॉ. चित्रा पाटील,सहकार्य जे जे पाटील, पंच मंडळाचे प्रमुख तथा आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, संजय म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, आशिष मात्रे राष्ट्रीय खेळाडू संजय मोकळ, राष्ट्रीय पंच गजानन मोकल, पांडुरंग पाटील, जनार्दन पाटील, मिलिंद पाटील व अन्य असोसिएशनचे पदाधिकारी आणि पंच व क्रीडा प्रेमी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी अभिनंदन केले आहे.






