विशेष मतदार पुनरीक्षणात अलिबागमध्ये बीएलओंची मनमानी?; घरोघरी पडताळणीऐवजी शाळा-मंदिरांतूनच कामकाज


अलिबाग( प्रतिनिधी): राज्यात ३० जूनपासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणे अपेक्षित आहे. मात्र, अलिबाग तालुक्यात काही ठिकाणी या सूचनांचे पालन होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करण्याऐवजी शाळा, मंदिरे किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी बसून मतदारांना तेथेच बोलावत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून अनेकांना पुनरीक्षण प्रक्रियेत सहभागी होणे कठीण जात आहे.

बीएलओ गावात कोणत्या ठिकाणी बसले आहेत, याची माहिती अनेक मतदारांपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांना मध्यस्थी करावी लागत असल्याचे चित्र आहे. नागरिकांना संबंधित ठिकाणी बोलावून अर्ज भरून घेणे व आवश्यक माहिती देण्याचे काम त्यांच्यामार्फत केले जात असल्याची चर्चा आहे. प्रशासनाने थेट नागरिकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना मतदारांनाच हेलपाटे मारावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, काही मतदारांनी त्यांच्या नावांचा समावेश उपलब्ध मतदार यादीत नसल्याची तक्रारही केली आहे. घरोघरी जाऊन काटेकोर पडताळणी झाल्यास अशा त्रुटी दूर होऊन मतदार यादी अधिक अचूक होऊ शकते, असे नागरिकांचे मत आहे.

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बीएलओंनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करावी आणि कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील सजग नागरिकांकडून होत आहे.

याबाबत जिल्हाधिकारी आणि संबंधित निवडणूक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वास्तव परिस्थितीची पाहणी करावी तसेच आवश्यक त्या सूचना देऊन मतदार पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शक व प्रभावीपणे राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.