अलिबाग(प्रतिनिधी): अलिबागहून पनवेलकडे जाणाऱ्या विनाथांबा एसटी बसचा मंगळवारी (दि. २१) सकाळच्या सुमारास पेझारी येथील चेकपोस्टजवळ अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात बसमधील सर्व ३८ प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली.
प्राथमिक माहितीनुसार, बस अलिबागहून पनवेलकडे नियमित फेरीवर निघाली होती. पेझारी चेकपोस्ट परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडून पलटी झाली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना आवश्यक उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. अपघाताचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास सुरू असून चालकाचा ताबा नेमका कशामुळे सुटला याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.






