फुफादेवी पाड्यात नवीन बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ


अलिबाग (प्रतिनिधी): फुफादेवी पाडा येथे आज कु. आद्य अमितदादा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामविकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नवीन बोअरवेलच्या माध्यमातून गावात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली.
या कामाचा शुभारंभ रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सारळचे माजी उपसरपंच मा. श्री. संजय (मामा) पाटील, श्री. चंद्रकांत (मामा) पाटील यांच्यासह गावातील मान्यवर, महिलामंडळाच्या सदस्या, तसेच स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे फुफादेवी पाड्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून, नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. गावकऱ्यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत संबंधित सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी अशा विकासकामांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. तसेच भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.