अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या 12 तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 47/2026 अन्वये भा.दं.वि. कलम 331(3), 305(अ) अंतर्गत गुन्हा 19 एप्रिल 2026 रोजी दाखल करण्यात आला होता. तक्रारदार कुंदनकुमार जितेंद्र सिंग (वय 33, सध्या भाकरवाड, ता. अलिबाग, मूळ बिहार) यांच्या घरात 18 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 दरम्यान अज्ञात चोरट्याने स्लायडिंग खिडकीचे लॉक तोडून प्रवेश केला. यावेळी घरातील 5 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रायगड, अपर पोलीस अधीक्षक तसेच पेण विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अनिल किसन राठोड (वय 24, रा. शास्त्रीनगर, अलिबाग) याची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली.
आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (MH 06 CN 2301) जप्त करण्यात आली आहे.
तपासादरम्यान आरोपी हा कामगारांच्या वसाहतींमध्ये दिवसा घर बंद असल्याची खात्री करून स्लायडिंग खिडकीतून आत प्रवेश करत असे. कोणतीही तोडफोड न करता तो चोरी करून पसार होत असल्याचे समोर आले. दारूच्या व्यसनासाठी पैशांची गरज भागवण्यासाठी त्याने घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोयनाड पोलिसांच्या या जलद कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.





