घरफोडी प्रकरणाचा अवघ्या 12 तासांत छडा; 23 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 12 तासांत यशस्वी छडा लावून सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन देहगाव (ता. अलिबाग) येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या फिर्यादी व्यक्तीच्या घरात 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1.30 ते सायंकाळी 6.00 या वेळेत घरफोडी झाली. यामध्ये आरोपींनी 18 तोळे सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत 18,200 रुपये), 4 लाख रुपये रोख रक्कम तसेच 85 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण 23,05,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.
या घटनेची तक्रार मिळताच पोयनाड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी महिला राणी विनायक चव्हाण (वय 29) हिचा शोध घेण्यात आला. ती आपल्या साथीदार शुभम पप्पू (पवनकुमार) जायसवाल (वय 26) याच्यासह उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर पोलिसांनी तत्काळ पथक पाठवून दोन्ही आरोपींना नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोयनाड पोलिसांनी दाखल झालेल्या गुन्ह्याचा अवघ्या 12 तासांत छडा लावून आरोपींना अटक केल्याने त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.