गंभीर गुन्हेगारांना पॅरोल देऊ नये : मंत्री अदिती तटकरे यांची ठाम मागणी


मुंबई (प्रतिनिधी) : बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले गुन्हेगार पॅरोलवर सुटून पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अशा अमानवी कृत्यांमध्ये दोषी असलेल्या गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देऊ नये, तसेच त्यांना पुन्हा समाजात वावरण्याची संधी देऊ नये, अशी ठाम भूमिका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मांडली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडली. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत संवेदनशील असून, या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली आहे. संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करून कठोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाच्या सचिवांना देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या निर्णयामुळे महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल, तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना कठोर संदेश जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.