कोकण विकासाचा कणा; दादांची दूरदृष्टी घेऊनच पुढे वाटचाल – सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे


रायगड (प्रतिनिधी): रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत विविध विकासकामांचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी “कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा असून, येथील पायाभूत सुविधा, पर्यटन, उद्योग आणि रोजगारनिर्मितीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे,” असे सांगितले. कोकणातील सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, सभापती विजया बाशिलकर, महाड येथील नेत्या स्नेहल जगताप, रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे तसेच रायगड जिल्हा परिषद सदस्य व मुख्य प्रतोद अमित नाईक उपस्थित होते. याशिवाय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात दिवंगत नेते दादांच्या कार्याचा उल्लेख करताना भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “आता दुसरे दादा होणे शक्य नाही, मात्र त्यांनी दिलेली दूरदृष्टी आणि विकासाचा विचार पुढे घेऊन आम्ही सातत्याने काम करत राहणार आहोत,” असे ते म्हणाले. रायगडसह संपूर्ण कोकणाच्या विकासासाठी पक्ष आणि शासन एकत्रितपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात विविध विकासकामांची माहिती देण्यात आली असून स्थानिक नागरिकांनीही या कामांचे स्वागत केले.