“रुग्णसेवेतून वाढदिवस साजरा; १२४ बालकांची मोफत हृदय तपासणी, अलिबागमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची मागणी”


रायगड (प्रतिनिधी): आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत 2डी इको तपासणी व बालहृदय शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू बालकांसाठी आयोजित या शिबिरात एकूण १२४ बालकांची तपासणी करण्यात आली असून सर्वाधिक ४२ बालके अलिबाग तालुक्यातील होती.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावागावातील रुग्णांशी सातत्याने संपर्क साधत बालकांना तपासणीसाठी आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक कुटुंबांना या शिबिराचा लाभ मिळाला. काही बालकांमध्ये हृदयविकाराची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” हा संदेश देण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर भर देत शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले.
“रायगड जिल्ह्यातील बहुतांश भाग ग्रामीण आणि दुर्गम आहे. अनेक रुग्णांना उपचारांसाठी मुंबई, पनवेल किंवा ठाणे येथे जावे लागते. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलतेने काम करत रुग्णांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या.
आमदार महेंद्र दळवी हे सातत्याने गरजू रुग्णांना मदत करत असल्याचे सांगताना, “रुग्ण उपचारासाठी बाहेरगावी गेल्यानंतरही तेथील कार्यकर्त्यांमार्फत रुग्णांची योग्य देखभाल केली जाते,” अशी माहिती त्यांनी दिली.
घरातील एखादे मूल आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होते. त्यामुळे अशा वेळी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
महिलांमध्ये वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अलिबाग येथे महिलांसाठी स्वतंत्र व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालय उभारण्याची गरज असल्याचे मतही मानसी दळवी यांनी व्यक्त केले. महिलांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी जिल्हास्तरावरच आधुनिक सुविधा उपलब्ध होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील अनेक पालकांना आपल्या मुलांची मोफत हृदय तपासणी करून घेण्याची संधी मिळाली. आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरला.
या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, डॉ. आशुतोष सिंह, डॉ. पूजा सिन्हा, जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशीकांत पाटील, शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा महिला संपर्कप्रमुख संजिवनी नाईक, मुरुड पंचायत समितीचे माजी सभापती रमेश नागावकर तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.