पावसाळी मासेमारी बंदी १ जूनपासून लागू; ६१ दिवस सागरी क्षेत्रात यांत्रिक मासेमारीला प्रतिबंध


रायगड (प्रतिनिधी): राज्यातील सागरी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन तसेच मासळीच्या प्रजनन काळाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यंदाही पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राज्याच्या क्षेत्रीय सागरी जलधी क्षेत्रात यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सलग ६१ दिवस लागू राहणाऱ्या या बंदीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या माहितीनुसार, पावसाळा हा मासळीच्या विविध प्रजातींच्या प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. या काळात मोठ्या प्रमाणावर यांत्रिक पद्धतीने मासेमारी केल्यास मत्स्यसंपत्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मत्स्यसंपत्तीचे जतन आणि भविष्यातील मासळी उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ही बंदी लागू करण्यात आली आहे.
ही बंदी केवळ यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांनाच लागू राहणार असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना त्यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना नेहमीप्रमाणे मासेमारी करता येणार आहे.

बंदीच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि मत्स्यव्यवसायाचा दीर्घकालीन समतोल राखण्यासाठी मच्छीमारांनी शासनाच्या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.