अलिबागच्या हिरकणीचा बुलढाण्यातील मातृतीर्थ जिजाऊ जन्मस्थळी सन्मान


अलिबाग  (प्रतिनिधी): महाराष्ट्राची छोटी हिरकणी म्हणून ओळख निर्माण करणारी कुमारी शर्विका अमृता जितेन म्हात्रे हिने नुकतीच कोकण मोहिमेदरम्यान रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २० दुर्ग सर करून आता बुलढाणा जिल्ह्यात पुढील मोहिमेसाठी दमदार पाऊल टाकले आहे. तिच्या या धाडसी मोहिमेचे बुलढाणा जिल्ह्यात विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून उत्साहात स्वागत व सन्मान करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथील ‘शिवशंभू पाईक’ संस्थेच्या वतीने शर्विकाचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मलकापूर-नांदुरा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी तिला विशेष भेट देत गौरव केला.
अवघ्या लहान वयात शर्विकाने धाडस, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या इतिहासाला नवसंजीवनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शर्विकाने वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षीच १०० हून अधिक गड-किल्ले सर करून अनोखा विक्रम प्रस्थापित केला. ‘जीवधन’सारखा कठीण किल्ला सर करून तिने आपल्या मोहिमेचे शतक पूर्ण केले. तसेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ अवघ्या साडेतीन वर्षांच्या वयात सर करून ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली. वयाच्या केवळ २ वर्षे १० महिन्यांत ‘कलवंतीण सुळका’ सर करून राष्ट्रध्वज फडकावण्याचा पराक्रमही तिने गाजवला आहे.
तिच्या या अद्वितीय कार्याची दखल “India Book of Records” ने घेतली असून आतापर्यंत तिने १९६ गिरीदुर्ग, भूमीदुर्ग आणि जलदुर्ग सर केले आहेत. शर्विकाच्या यशामागे तिचे आई-वडील जितेन म्हात्रे आणि अमृता म्हात्रे यांचे संस्कार, मार्गदर्शन आणि सह्याद्रीप्रेम मोठ्या प्रमाणात दिसून येते.
मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी माँसाहेब जिजाऊ यांच्या पावन भूमी सिंदखेड राजा येथे विविध पत्रकार, राजकीय मान्यवर, ग्रामस्थ तसेच भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोदजी वाघ यांच्या उपस्थितीत शर्विकाचा जिजाऊंची प्रतिमा व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी तिला जिजाऊंच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढे नेण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सासरवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंड (चिखली) येथे आईसाहेब गुणवंताबाई इंगळे यांच्या वंशज हरि रुद्र प्रतापरुद्रजी इंगळे यांनी शर्विकाची भेट घेत तिचा सन्मान केला. यावेळी त्यांनी करवंड दुर्गाचा ऐतिहासिक वारसा आणि शिवकालीन माहितीही सांगितली.
बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक यांनीदेखील शर्विकाला आशीर्वाद देत तिच्या मोहिमेचे कौतुक केले. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी शाळा सहकार विद्या मंदिर येथे सौ. कोमलताई यांच्या हस्ते तिचे विशेष स्वागत करण्यात आले. शाळेच्या ३२ एकर विस्तीर्ण परिसराची माहितीही तिला देण्यात आली. बुलढाणा नगरपालिकेचे नगरसेवक अनिलजी वर्मा यांनीही कौटुंबिक भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
आजची युवा पिढी मोबाईल आणि आभासी जगात रमलेली असताना शर्विकाने गड-किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहास, संस्कृती आणि साहस यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे. तिची ही कामगिरी लाखो मुला-मुलींना जिद्द, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारी ठरत आहे.
“उंच भरारी घेण्यासाठी वय लागत नाही,
लागते ती जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत…
सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली ही लेक,
आज महाराष्ट्राच्या अभिमानाचा तुरा बनली आहे.”
इतक्या दूरवर शर्विकाला मिळालेला सन्मान म्हणजे रायगड जिल्ह्याचाच सन्मान असल्याची भावना तिच्या पालकांनी व्यक्त केली. बुलढाणा मोहिमेदरम्यान शर्विकाने आणखी दोन दुर्ग सर केले असून तिची एकूण दुर्गसंख्या आता १९६ वर पोहोचली आहे. लवकरच ती कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रांगणा दुर्ग सर करून २०० दुर्गांचा टप्पा गाठणार आहे. बुलढाणा मोहिमेत मिळालेल्या जिजाऊंच्या आशीर्वादामुळे आणि विविध क्षेत्रांतून झालेल्या सन्मानामुळे तिला पुढील वाटचालीसाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.