अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तहसील कार्यालय परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयात विविध कामांसाठी दररोज शेकडो नागरिक ये-जा करत असतात. मात्र कार्यालयाच्या आवारात सर्वत्र कचऱ्याचे ढिग, प्लास्टिकच्या बाटल्या, साचलेले पाणी आणि अस्वच्छता दिसून येत असल्याने प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कार्यालय परिसरात अनेक ठिकाणी गवत वाढले असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणीही अस्वच्छता पसरली असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही नागरिकांनी सांगितले की, तहसील कार्यालय हे महत्त्वाचे शासकीय कार्यालय असून येथे रोज महसूल, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, निवडणूक तसेच इतर शासकीय कामांसाठी मोठी गर्दी असते. मात्र अशा ठिकाणी मूलभूत स्वच्छतेचा अभाव दिसून येणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
संबंधित विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करावा, नियमित साफसफाईची व्यवस्था करावी तसेच कचरा व्यवस्थापनावर लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Home ताज्या बातम्या अलिबाग तहसील कार्यालय आवारात घाणीचे साम्राज्य नागरिकांकडून तीव्र नाराजी; स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष






