“ऑनलाईन औषध विक्रीविरोधात रायगडमध्ये आज औषध विक्रेत्यांचा बंद; अत्यावश्यक सेवा मात्र सुरू”


अलिबाग(प्रतिनिधी): ऑनलाईन औषध विक्री, प्रलंबित मागण्या आणि सरकारच्या दुर्लक्षाविरोधात रायगड जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी आज, २० मे रोजी एकदिवसीय बंद पुकारला आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या नेतृत्वाखाली देशभरात हे आंदोलन होत असून रायगडमधील सुमारे दोन हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात सुमारे १२ लाख औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी होत आहेत.
बंदमुळे अनेक औषध दुकाने बंद राहणार असली तरी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील यांनी दिली. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकली जात असल्याने अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर वाढत आहे. तसेच बनावट औषधांचा धोका वाढत असल्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मोठ्या कंपन्या मोठ्या सवलती देऊन औषध विक्री करत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे.