रायगड (प्रतिनिधी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या रखडलेल्या कामांमुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतानाही खारपाडा टोल नाक्यावर टोल वसुली सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड प्रेस क्लबच्या वतीने तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ज्येष्ठ पत्रकार मा. एस. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खारपाडा टोल नाका येथे आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड प्रेस क्लबने यावेळी काही प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तातडीने बंद करण्यात यावी, तिन्ही उड्डाणपूल तसेच इंदापूर–माणगाव बायपासचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, तसेच या महामार्गाला आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
अपूर्ण कामामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, खड्डे आणि अपघातांचा धोका वाढल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
Home ताज्या बातम्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल बंद करा; रायगड प्रेस क्लबचा ठिय्या...






