अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शहरातील श्रीबाग येथील गणेश मंदिर रोड परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे अलिबाग नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना तथा विरोधी पक्षनेते नगरसेवक संदीप जनार्दन पालकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गणेश मंदिर रोड, श्रीबाग परिसरात नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. अनेक वेळा संपूर्ण महिनाभर काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणीच पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असून परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समस्येबाबत नागरिकांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्यापही पाणीटंचाईचा प्रश्न कायम असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. “आज पाणी येईल, उद्या येईल” अशी आश्वासने देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही दि. ३ जून २०२६ रोजी या प्रश्नासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना लवकरात लवकर या प्रश्नात लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांनीही नगरपरिषदेने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या उंबरठ्यावरही शहरातील काही भागांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.




