सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्ध महिलेचा खून; अपहरण करून मृतदेह दरीत फेकला


मांडवा सागरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन आरोपी जेरबंद, १० तोळे सोन्याचे दागिने जप्त

अलिबाग (प्रतिनिधी): सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी एका वृद्ध महिलेचे अपहरण करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मांडवा सागरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून मृत महिलेचे सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सारळ आदिवासीवाडी (ता. अलिबाग) येथील सुंदरा लक्ष्मण पाटील (वय ५८) या महिला ३१ मे २०२६ रोजी बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक किशोर लक्ष्मण पाटील यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मिसिंग रजिस्टर क्रमांक ०८/२०२६ दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेली माहिती, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुंदरा पाटील या शेवटच्या वेळेस अनदर्शी हिराजी शेडगे (वय ३२) व रितेश नरेश लोहार (वय २०, दोघेही रा. तिनवीर, ता. अलिबाग) यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीत विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला.
यानंतर मांडवा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), २३८(अ), ६१(२), १४०(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ४ जून रोजी दोन्ही आरोपींना अटक केली.
पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. सुंदरा पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना तिनवीर परिसरात नेऊन पिकअप वाहनामध्ये नायलॉनच्या दोरीने गळा आवळून ठार मारण्यात आले. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून देण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले.
आरोपी अनदर्शी शेडगे याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली. प्रतापगड शोध व बचाव पथकाच्या मदतीने दरीतून काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख सुंदरा पाटील यांची असल्याचे निश्चित केले.
तपासादरम्यान आरोपी अनदर्शी शेडगे याच्याकडून अंदाजे १ लाख ४९ हजार १०० रुपये किमतीचे सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच खून करण्यासाठी वापरण्यात आलेली नायलॉनची दोरी आणि गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा पिकअप वाहन (क्र. एमएच-०५ ईएल-५२४३) देखील जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने १२ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक तसेच तपास पथकातील अधिकाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.