शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान राजिपची नियोबद्ध कामगिरी सोयीसुविधांमुळे शिवभक्तांमध्ये समाधान


अलिबाग(प्रतिनिधी): श्री शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी अतिशय नियोजनबद्ध कामगिरी केली असून याबाबत शिवभक्तांनीही समाधान व्यक्त केले.
या सोहळ्यानिमित्त लाखो शिवभक्त हे किल्ले रायगडावर आले होते. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होउ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य विभागच्या वतीने सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सोहळ्यानंतर गडावर स्वच्छतेचे कामही युद्धपातळीवर करण्यात येत आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने स्वच्छता विभागाच्या वतीने गडावर सुमारे 150 स्वच्छतागृहे उभारण्यात आली होती. यासोबतच उन्हाच्या तडाख्यामुळे शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी 5 व 6 जून दरम्यान सुमारे 45 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्याचप्रमाणे गडावर व गडाखाली 62 पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या. यासोबतच 5 आरओ प्लांट व 250 पाण्याचे जार उपलब्ध करण्यात आले होते.
सोहळ्याची सांगता झाल्यानंतर गडाचे पावित्र्य राखण्यासाठी गडावर झालेला कचरा गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. गडावरील सुमारे 4 ते 5 टन कचरा गोळा करण्यात आला आहे.
शिवभक्तांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागाने गडावर आणि पायथ्याशी विशेष वैद्यकीय पथके, 24×7 रुग्णवाहिका आणि मुबलक औषधसाठ्यासह सज्जता ठेवली होती. शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दोन दिवस एकूण 13 विशेष वैद्यकीय पथके तसेच जिल्हा रुग्णालयाच्या वतीने होळीचा माळ येथे 25 खाटांच्या सुसज्ज व सर्व सोयींनीयुक्त अशा तात्पुरत्या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. या जिल्हा परिषदेच्या आरोग्य सुविधांचा सुमारे 10 हजार 575 शिवभक्तांनी लाभ घेतला. तर जिल्हा रुग्णालयातर्फे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयाचा व पथकांचा 3821 शिवभक्तांनी लाभ घेतला.
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रूपाली सातपुते, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता मोहन सरवदे, पाणी व स्वच्छता विभाग प्रकल्प संचालक शुभांगी नाखले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्राची नेहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी नियोजनबद्ध कामगिरी केली असल्याने सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल होत असतात. त्यांची कोणतीही गैरसोय होउ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही जय्यत तयारी केली होती. अधिकारी व कर्मचा-यांनी आपआपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याने कोणाचीही गैरसोय झाली नाही.
– मंगेश वाकडीवर, अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक किल्ले रायगडावर दाखल झाले होते. गडावर पाणी, आरोग्य व स्वच्छता याबाबत कटाक्षाने लक्ष देण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्गाने अतिशय चांगले व नियोजनबद्ध काम केले.
– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद