तुफान गर्दी, पण नियोजन चोख!


रायगड (धनंजय कवठेकर): किल्ले रायगडावर काल ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यामागे रायगड पोलिसांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले.
कार्यक्षम पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या सुयोग्य नियोजनामुळे संपूर्ण सोहळा कोणतेही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडला. वाहतूक व्यवस्थापन, गर्दीवर नियंत्रण आणि शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा अखंडपणे कार्यरत होती.
डोक्यावर कडक उन्हाचा तडाखा असतानाही पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर ठामपणे उभे राहून आपली जबाबदारी पार पाडत होते. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सेवाभाव यांचे उत्कृष्ट उदाहरण रायगड पोलिसांनी या सोहळ्यातून दाखवून दिले.
भविष्यातही असे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळे या वर्दीतल्या मावळ्यांच्या योगदानामुळे यशस्वीपणे पार पडत राहतील, याची खात्री या निमित्ताने पुन्हा एकदा पटली.
सद्रक्षणाय खलनिघ्रणाय! जय हिंद, जय शिवराय!