अलिबाग जिल्हा रुग्णालयाबाहेर शिवसेनेच्या मदत कक्षाचे उद्घाटन; रुग्ण व नातेवाईकांना मिळणार २४ तास मदत


अलिबाग  (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आमदार महेंद्र दळवी रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर शिवसेनेच्या वतीने रुग्ण मदत कक्ष सुरू करण्यात आला. अलिबाग शहरप्रमुख विकास करणेकार यांच्या नेतृत्वाखाली हा मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने जिल्ह्याच्या विविध भागांतून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येत असतात. अशा वेळी त्यांना विविध शासकीय प्रक्रिया, विभागांची माहिती तसेच अन्य आवश्यक बाबींमध्ये अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपत हा मदत कक्ष सुरू केला आहे.
या मदत कक्षामार्फत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना २४ तास मार्गदर्शन, आवश्यक माहिती आणि शक्य ती सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरप्रमुख विकास करणेकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची संपूर्ण टीम या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ पक्षवाढीसाठी नसून समाजसेवेच्या भावनेतून सुरू करण्यात आला आहे. येत्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून रुग्णसेवेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून गरजू नागरिकांना अधिकाधिक मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून, रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्यांना याचा मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.