लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त नगराध्यक्षा अक्षया नाईक यांचे अभिवादन; विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार


अलिबाग(प्रतिनिधी): लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य, राष्ट्रप्रेम, शिक्षण आणि सामाजिक जागृतीसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करण्यात आले.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा लोकमान्य टिळकांचा विचार आजही देशातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी असल्याचे नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी नमूद केले.

त्या म्हणाल्या, “लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. समाजात राष्ट्रीय चेतना जागविण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहित, लोकसेवा आणि विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

यावेळी उपस्थितांनीही लोकमान्य टिळक यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.