अलिबाग (प्रतिनिधी): दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातही तीव्र प्रतिक्रिया उमटली. अलिबाग शहरात काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात निषेध रॅली काढण्यात आली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी करण्यात आलेल्या वागणुकीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
निदर्शनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हातावर काळ्या फिती बांधून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर बळाचा वापर करणे हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याची भूमिका यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. देशातील तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता केंद्र सरकारने त्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या निषेध रॅलीत अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील दशरथ थळे, तालुका कार्याध्यक्ष आकाश राणे, नगरसेवक समीर मधुकर ठाकूर, शहराध्यक्ष अभय म्हामुणकर, माजी अध्यक्ष योगेश मगर, भास्कर चव्हाण, काका ठाकूर, प्रभाकर राणे, सरोज डाकी, कृष्णा भोपी, ॲड. उमेश मधुकर ठाकूर, ॲड. दिनेश सोष्टे, शैलेश घरत, समद कुर, मुजफ्फर चौधरी, समीर जनार्दन ठाकूर, मेघनाथ पाटील, महेंद्र पाटील, चंद्रकांत खोत, महेश पडते, मनोहर म्हात्रे, नंदकुमार पाटील, जाहिंद्र पाटील, शुभम ठाकूर, भूषण मगर, सतीश म्हात्रे, प्रकाश घरत, प्रमोद पाटील, साहिल कुर, संतोष पाटील, श्रीनिवास पोळ, हनुमंत सुरेकर, रमाकांत म्हात्रे, सूचित थळे, संजय शिंदे, किशोर सातमकर, शहानवाज शेखरन यांच्यासह अलिबाग तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




