आदिवासी, गोरगरीब व गरजूंसाठी आंबेपूरमध्ये ‘आरोग्य मदत वाहिनी’ सुरू


तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिका सेवा; राजाभाई केणी व रसिकाताई केणी यांच्या हस्ते उद्घाटन

अलिबाग (प्रतिनिधी): आदिवासी, गोरगरीब आणि गरजू नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी वेळेत रुग्णालयात पोहोचता यावे, या उद्देशाने आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने ‘आरोग्य मदत वाहिनी’ अर्थात रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी आणि रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रसिकाताई केणी यांच्या हस्ते हेमनगर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात या रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना अचानक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास रुग्णालयात पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना तातडीच्या काळात वाहन उपलब्ध होणे ही मोठी समस्या ठरते. ही बाब लक्षात घेऊन आंबेपूर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य मदत वाहिनी सुरू करण्यात आली आहे.
अपघात, प्रसूती, गंभीर आजार तसेच अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आंबेपूर परिसरातील आदिवासी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांना आरोग्यसेवेच्या दृष्टीने मोठा आधार मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना राजाभाऊ केणी म्हणाले की, “शिवसेना ही केवळ राजकारण करणारी संघटना नसून समाजाच्या सुख-दुःखात धावून जाणारी संघटना आहे. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून आंबेपूर परिसरातील आदिवासी, गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी ही आरोग्य मदत वाहिनी सुरू करण्यात आली आहे. एखाद्या रुग्णाला योग्य वेळी रुग्णालयात पोहोचवून त्याला उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे, हीच खरी समाजसेवा आहे.”
या रुग्णवाहिका सेवेचा आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजाभाई केणी आणि रसिकाताई केणी यांनी केले.
या सेवाभावी उपक्रमाला रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागप्रमुख सौतीन भातरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.