नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारवर शेकापची टीका; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध


अलिबाग (प्रतिनिधी) : नीट पेपरफुटीप्रकरणी न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेला खेळ थांबवावा, या मागण्यांसाठी दिल्लीतील संसद भवन परिसरात दाद मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचा शेतकरी कामगार पक्षाने तीव्र निषेध केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित निषेध कार्यक्रमात शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या की, नीट पेपरफुटीविरोधातील हा लढा केवळ विद्यार्थ्यांचा नसून देशाच्या भवितव्याचा, न्यायाच्या हक्काचा आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाचा आहे. मात्र, आपल्या हक्कांसाठी आवाज उठविणाऱ्या लाखो तरुणांना सरकारने संवादाऐवजी पोलिसी बळाचा वापर करून लाठीमाराने उत्तर दिले. ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असून तिचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

त्या पुढे म्हणाल्या की, “तरुणांनो जागे व्हा, रात्र वैऱ्याची आहे. संविधानावर आणि लोकशाहीवर घाला घालणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आता आली आहे. देशाचा कारभार सुशिक्षित आणि जागरूक नागरिकांच्या हाती जाणे ही काळाची गरज आहे.”

नीट परीक्षा ही वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची प्रवेश परीक्षा असून सुमारे १ लाख ७६३ जागांसाठी तब्बल २५ लाख विद्यार्थी परीक्षा देतात. मात्र, पेपरफुटीमुळे या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आणि त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांची अनेक वर्षांची मेहनत व स्वप्ने धुळीस मिळाली, अशी घणाघाती टीका ॲड. मानसी म्हात्रे यांनी केली.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची तसेच शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.