अलिबाग( प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील करदाते आणि कर कपात करणाऱ्यांसाठी अलिबागमध्ये जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अलिबाग नगरपरिषदेच्या सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली. ठाणे-पनवेल येथील आयकर विभागाच्या टीडीएस शाखेने आयोजित केलेल्या या कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित करदात्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधण्यात आली. त्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कार्यशाळेतून प्राप्त झाल्याचे दिसून आले.
पुणे येथील आयकर आयुक्त वैभव जैन आणि ठाणे येथील अतिरिक्त आयकर आयुक्त समृद्धी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत ठाणे येथील उप-आयकर आयुक्त शैलेश कुमार, ठाणे येथील आयकर अधिकारी गिरीश कांबळे, पनवेल येथील आयकर अधिकारी रत्नेश कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रायगड जिल्ह्यातील करदाते आणि कर कपात करणाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस सुमारे 70 व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. दरम्यान अलिबागच्या नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी या कार्यशाळेत सहभाग घेऊन आयकर विभागाची माहिती आत्मसात केली. यावेळी त्यांनी ठाणे येथील उप-आयकर आयुक्त शैलेश कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अशा प्रकारची कार्यशाळा होणे गरजेचे आहे. कराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती असणे आवश्यक असल्याचे नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी सांगितले. या संधीचा फायदा करदात्यांनी घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले.





