अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अदितीताई तटकरे यांच्याकडून सोनचाफ्याचे वृक्षारोपण


अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुतारवाडी येथील निवासस्थानी सोनचाफ्याचे झाड लावून त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. अजितदादा पवार यांचे आवडते फूल सोनचाफा असल्याने त्यांच्या स्मृतींना उजाळा देत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी अदितीताई तटकरे यांनी भावनिक आठवणींना उजाळा देत सांगितले की, सुतारवाडीतील हे निवासस्थान अजितदादा पवार यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण होते. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचे येथे नियमित येणे-जाणे असायचे. इतकेच नव्हे, तर त्यांचा वाढदिवसही याच घरात अनेकदा उत्साहात साजरा झाला आहे. या वास्तूत निवांत वेळ घालवणे, कार्यकर्त्यांशी आणि कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारणे त्यांना विशेष आवडायचे.
या निवासस्थानी अजितदादा पवार यांच्या असंख्य आठवणी आजही जिवंत असल्याचे सांगत अदितीताईंनी, “आज लावलेले सोनचाफ्याचे हे झाड फुलत राहील आणि त्याचा दरवळ मला नेहमीच आदरणीय दादांच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल. त्यांच्या आशीर्वादाचे बळ आणि प्रेरणा या वृक्षातून कायम मिळत राहील,” अशी भावना व्यक्त केली.
अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपणाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेले हे अभिवादन उपस्थितांच्या मनाला भावले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच एका जिव्हाळ्याच्या नात्याच्या आठवणींना उजाळा देणारा हा उपक्रम विशेष ठरला.