अलिबाग (प्रतिनिधी) : लायन्स क्लब श्रीबाग यांच्या वतीने स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्लबच्या एम.जे.एफ. डॉ. ॲड. निहा अनिस राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. ॲड. निहा अनिस राऊत (डी.सी. ग्लोबल कॉज) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दारू, तंबाखू आणि इतर व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम सोप्या भाषेत समजावून सांगितले. “व्यसन करायचेच असेल तर अभ्यासाचे करा, व्यायामाचे करा, चांगल्या सवयींचे करा आणि एकमेकांना मदत करण्याचे करा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थित युवक-युवतींना दिला. निरोगी जीवनशैली स्वीकारून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात महाराष्ट्राच्या गायिका ॲड. कला पाटील यांनी युवक-युवतींना भगवद्गीतेचे महत्त्व विशद करत जीवनातील नैतिक मूल्ये, आत्मविश्वास आणि योग्य निर्णयक्षमतेसाठी गीतेचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते, असे सांगितले.
या कार्यक्रमास प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, अकॅडमीचे विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प केला.





