अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील शिवकालीन ऐतिहासिक श्रीभिल्लेश्वर तलावाच्या सर्वांगीण विकासाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सुमारे सात एकर क्षेत्रफळ असलेल्या या तलावात गेल्या चार दशकांपासून मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत हाती घेण्यात आले असून पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने गेल्या महिनाभरापासून गाळ उपसणी सुरू आहे. गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तलावाचा सर्वांगीण विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय किहीम ग्रामपंचायतीने घेतला आहे.
बंगळुरूचे प्रसिद्ध जलसंवर्धन तज्ज्ञ ‘लेकमॅन’ आनंद मल्लीगवाड यांनी अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील गोकुळेश्वर तलावाचा यशस्वी विकास केल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच श्रीभिल्लेश्वर तलाव विकास प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. किहीमचे सरपंच प्रसाद (पिंट्याशेट) गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आरसीएफ कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून (CSR) आर्थिक मदत जाहीर केली असून, अन्य देणगीदार व संस्थांकडूनही निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तलावाचा विकास पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे. तलाव परिसरात वॉकिंग ट्रॅक, खुल्या व्यायामशाळेची साधने, मुलांसाठी खेळाची उपकरणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था तसेच बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तज्ज्ञ आनंद मल्लीगवाड यांनी सांगितले की, तलावाच्या सभोवताल विविध प्रजातींची झाडे लावली जाणार असून तलावाच्या मध्यभागी पक्षी व बदकांसाठी मातीचे बेट तयार करण्यात येईल. यामुळे जैवविविधतेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच तलावातील संपूर्ण गाळ काढल्याने त्याची पाणीसाठवण क्षमता वाढेल. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठून भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल. त्याचबरोबर श्रीभिल्लेश्वर मंदिराजवळील विहिरीच्या पाण्याची पातळीही वाढण्याची अपेक्षा आहे.
किहीमचे उपसरपंच मिलिंद पडवळ यांनी सांगितले की, तलावाच्या विकासामुळे श्रीभिल्लेश्वर मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यटनाला चालना मिळेल. परिणामी स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन गावाच्या आर्थिक विकासालाही हातभार लागणार आहे.
शिवकालीन वारसा, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन विकास यांचा संगम साधणारा हा प्रकल्प किहीम गावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून श्रीभिल्लेश्वर तलाव लवकरच नव्या रूपात नागरिकांसमोर येणार आहे.





