हाशिवरे कमान ते शिवाजी चौक डांबरी रस्त्याच्या अंतिम टप्प्याच्या कामाला सुरुवात


अलिबाग (प्रतिनिधी) : हाशिवरे कमान ते शिवाजी चौक या महत्त्वाच्या डांबरी रस्त्याच्या अंतिम तिसऱ्या टप्प्यातील सील कोट कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद अमितदादा नाईक यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे काम मार्गी लागले असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
हाशिवरे कमान ते शिवाजी चौक हा रस्ता गावातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले असून आता अंतिम तिसऱ्या टप्प्यातील सील कोट कामाला सुरुवात झाल्याने रस्ता अधिक मजबूत आणि टिकाऊ होणार आहे.
या कामामुळे आगामी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचणे, खड्डे निर्माण होणे तसेच वाहतुकीतील अडथळे यांसारख्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार आहे. परिणामी नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता येणार असून वाहनधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
स्थानिक नागरिकांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद अमितदादा नाईक यांचे आभार मानले आहेत. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून भविष्यातही विविध विकासकामे मार्गी लावण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.