“१.४० लाखांची लाच घेताना एपीएमसी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”


नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत १ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एपीएमसीमध्ये ठेकेदार म्हणून काम करतात. त्यांनी केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी अतिरिक्त पदभार उपसचिव तथा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक शरद आवटे आणि अतिरिक्त पदभार स्वच्छता अधिकारी समीर नारायण म्हात्रे यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार यांच्या एका वर्षाच्या कामाच्या बिलाच्या रकमेवर १५ टक्के प्रमाणे सुरुवातीला सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. नंतर तडजोडीअंती ही रक्कम १ लाख ४० हजार रुपये ठरवण्यात आली.
तक्रारदार यांनी याबाबत १५ मे रोजी एसीबी कार्यालयात तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार समीर म्हात्रे यांनी एपीएमसी कार्यालयातील त्यांच्या केबिनमध्ये १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणात दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.