मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; चार वाहनांचे मोठे नुकसान


रायगड (प्रतिनिधी): मुंबई–गोवा महामार्गावर मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या दिशेने महाडकडे जात असताना एका ऑइल टँकरने समोरून येणाऱ्या तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात इर्टिगा कार, मिनी बस आणि रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने वाहतूक नंतर सुरळीत करण्यात आली.

सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.