३५ हजार घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”


पनवेल (प्रतिनिधी):सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पनवेल तहसील कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालकीच्या पनवेल परिसरातील जागेचा सातबारा त्यांच्या नावावर करण्याचे काम सुरू होते. हे काम करून देण्यासाठी मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदार आणि संबंधित अधिकाऱ्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर ही रक्कम ३५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
दरम्यान, तक्रारदार यांनी याबाबत रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार पनवेल तक्का परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी गोवर्धन माने यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.